ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील १७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना १०१ कोटींची कर्जमाफी ! १० हजार शेतकऱ्यांना ४५ कोटींचे प्रोत्साहन अनुदान !! राज्य शासनाच्या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ


नसरापूर : भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १७ हजार १७३ शेतकऱ्यांच्या सुमारे १०१ कोटी रुपयांच्या कर्जाची माफी करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या १० हजार ८४३ शेतकऱ्यांना ४५ कोटी ३३ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक भालचंद्र जगताप यांनी दिली.

नसरापूर येथील जिल्हा बँकेच्या शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी स्वप्नील कोडे, सचिन परदेशी, राजेश खोपडे, सदानंद सोनवणे, आशिष मारणे, सागर गाडे आणि संपतराव जगताप उपस्थित होते.

Advertisement

जगताप यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २१०२ कोटी १० लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५ हजार ७७२ लाभार्थ्यांची ४३ कोटी ६८ लाख रुपयांची कर्जरक्कम माफ करण्यात आली असून, एकवेळ समझोता योजनेत ५८८ लाभार्थ्यांना ११ कोटी ७६ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.

सन २०२२ ते २०२५ या कालावधीत किमान दोन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. शासनाच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळत असून कृषी क्षेत्राला नवी उभारी मिळत असल्याचा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!