कुस्तीच्या आखाड्यात भोरच्या दर्शना म्हस्केची हॅट्ट्रिक ! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पुन्हा निवड
भोर : भोर तालुक्यातील उदयोन्मुख महिला कुस्तीपटू पै. दर्शना संतोष म्हस्के हिची सलग तिसऱ्यांदा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर दर्शनाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
यंदाही तालुका स्तरावरील निवड चाचण्यांमध्ये प्रभावी कामगिरी करत तिने जिल्हा स्पर्धेतील आपले स्थान कायम राखले. सलग तिसऱ्या वर्षी जिल्हा कुस्ती स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने तिच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे कौतुक होत आहे.
दर्शना ही दैनिक पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार संतोष म्हस्के यांची कन्या असून, शिक्षणासोबतच कुस्ती क्षेत्रातही तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
ग्रामीण भागातील मुलींनी खेळ क्षेत्रात पुढे यावे, यासाठी तिची कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे. दर्शना हिच्या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, शिक्षक, पत्रकार तसेच विविध सामाजिक संघटनांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी जिल्हा स्पर्धेतही ती उल्लेखनीय यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




