भोरच्या जैवविविधतेत दुर्मिळ बेडकाची भर ! वेळू येथे इंडियन बलून फ्रॉगची नोंद !! फुग्यासारखे शरीर फुलवणारा व जमिनीखाली बिळात राहणारा
सारोळा : भोर तालुक्यातील वेळू गावात दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण इंडियन बलून फ्रॉग या बेडकाची प्रथमच प्रत्यक्ष नोंद झाली आहे. भात काढणीदरम्यान शेतकऱ्याला आढळलेल्या या बेडकाची वन्यजीव अभ्यासकांनी ओळख पटवली. स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीने ही नोंद महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
वेळू येथील शेतकरी व सर्पमित्र शंकर वाडकर हे शेतात भात काढणीचे काम करत असताना त्यांना जमिनीवर वेगळ्या स्वरूपाचा बेडूक दिसला. त्याचे वैशिष्ट्य ओळखून त्यांनी त्याला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. त्यानंतर पुणे जिल्हा वन्यप्राणी सर्परक्षक असोसिएशनचे सदस्य व वन्यजीव अभ्यासक गणेश माने यांच्याकडे ओळख पटवण्यासाठी दिला.
गणेश माने यांनी हा बेडूक इंडियन बलून फ्रॉग असल्याचे स्पष्ट केले. या बेडकाचे शास्त्रीय नाव ‘Uperodon globulosus’ असे आहे. धोका जाणवल्यास शरीरात हवा भरून फुग्यासारखा गोलाकार होणे हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हा बेडूक प्रामुख्याने जमिनीखाली बिळात राहतो. वाळवी आणि मुंग्या हे त्याचे प्रमुख खाद्य असून, प्रजननासाठी तो पावसाळ्यात जमिनीबाहेर येतो.
वेळू परिसरात यापूर्वी या प्रजातीची प्रत्यक्ष नोंद नसल्याने ही घटना वन्यजीव अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.
चौकट :
वन्यजीवांना त्रास देऊ नका; संरक्षणासाठी पुढाकार घ्या !
शंकर वाडकर व गणेश माने यांनी वन्यजीवांना त्रास न देता त्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. वन्यजीव आढळल्यास त्यांना स्वतः हाताळण्याऐवजी वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा. निसर्गातील प्रत्येक जीवाचे संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.




