भोंगवलीतील शासनाचा बंधारा गायब ! कृषी, महसूल विभागाची संयुक्त चौकशी करण्याची मागणी
कापूरहोळ : भोर तालुक्यातील भोंगवली येथील गट क्रमांक १९३ आणि १९९ मधील शासननिर्मित बंधारा पुणे ट्रान्समिशन कंपनीने आवश्यक परवानगीशिवाय बुजवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित प्रकारामुळे शेतकरी आणि वन्यजीवांच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
याप्रकरणी बाळासाहेब शेडगे यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मात्र, पाहणीदरम्यान त्या ठिकाणी बंधारा आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शासनाच्या निधीतून उभारलेला बंधारा नेमका कधी, कोणी आणि कोणत्या परवानगीने बुजवला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा आधार मिळत होता. तो बुजवण्यात आला असल्यास शेती, पाणीसाठा तसेच वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्यावर परिणाम होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कथित नुकसानीचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती निश्चित करण्यासाठी तांत्रिक तपासणी करण्याची मागणीही होत आहे.
परिसरातील जमीन, उत्खनन आणि औद्योगिक कामांबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर कृषी, महसूल आणि अन्य संबंधित विभागांनी संयुक्तपणे सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
बंधारा बुजविल्याचे आणि शासनाच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यास जबाबदारांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच पाहणीचा अहवाल, बंधाऱ्याची नोंद आणि आवश्यक परवानग्यांची माहिती प्रशासनाने सार्वजनिक करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




