भोर तालुक्यात पोलीस पाटलाची निघृण हत्या ! घोरेपडळ-सांगवी बुद्रुक परिसरात खळबळ !! हत्येचे गूढ उकलण्याचे राजगड पोलिसांसमोर आव्हान
नसरापूर : भोर तालुक्यातील घोरेपडळ-सांगवी बुद्रुक येथे पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. गावातील जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या पोलीस पाटलाच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास ही गंभीर घटना घडली. मात्र, अशोक येनपुरे यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला झाला, हत्येमागे वैयक्तिक वाद आहे की अन्य काही कारण, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेचा नेमका घटनाक्रमही स्पष्ट झालेला नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याकडून तपासाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. हत्येमागील कारणांचा शोध घेणे, संशयितांची माहिती मिळवणे आणि आरोपींना तातडीने जेरबंद करणे, ही पोलिसांसमोरील महत्त्वाची आव्हाने आहेत.
या घटनेमुळे भोर तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपासाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. या हत्येचे गूढ लवकरात लवकर उकलून आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




