ताज्या घडामोडी

 नसरापूरकरांचा वनविभागाला निर्वाणीचा इशारा ! बिबट्याचा बंदोबस्त करा !! अन्यथा तीव्र आंदोलन


नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात बिबट्याचा वाढता वावर आणि पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळकरी मुले, महिला, शेतकरी, व्यापारी आणि पशुधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

यासंदर्भात बुधवारी (दि. १८) वनपरिक्षेत्र अधिकारी, नसरापूर यांना लेखी निवेदन देण्यात आले. वनविभागाचे कर्मचारी सुनील माळवे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी वनरक्षक तुषार कुंभार व संदीप ससाने उपस्थित होते.

Advertisement

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांना घराबाहेर पडतानाही भीती वाटत आहे. विशेषतः शाळेत जाणारी लहान मुले, शेतात काम करणारे शेतकरी आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर नुकसानभरपाई देऊन गेलेला जीव परत मिळणार आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

निवेदनात गावात भोंगे व ध्वनिक्षेपक बसविणे, वनविभागामार्फत नियमित गस्त घालणे, कॅमेरा ट्रॅप लावणे आणि नागरिकांना सतर्कतेचे संदेश देण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य हाडके, सचिव प्रवीण ठोंबरे, सर्पमित्र विलास धोंगडे, नवनाथ कचरे, सायली वालगुडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभागाने दुर्लक्ष न करता तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामस्थ व युवकांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!