पुणे-सातारा महामार्गावर क्रूरतेचा कळस ! पाय बांधलेल्या रक्तबंबाळ घोरपडीला सर्पमित्रांनी दिले जीवदान
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर येथील फ्लायओव्हरजवळ मागील दोन्ही पाय बांधलेल्या आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या घोरपडीला सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. पुणे जिल्हा वन्य प्राणी सर्प रक्षक असोसिएशनच्या सदस्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि वनविभागाच्या सहकार्यामुळे या दुर्मिळ वन्यजीवाची सुरक्षित सुटका करून तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
घोरपड जखमी अवस्थेत पडल्याची माहिती बाबू वाल्हेकर यांनी सर्पमित्र विलास धोंगडे यांना दिली. माहिती मिळताच धोंगडे यांनी सहकारी श्रीकांत खेडकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान घोरपडीचे मागील दोन्ही पाय घट्ट बांधलेले असून त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे निदर्शनास आले. सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक घोरपडीची सुटका करून तिच्यावर प्राथमिक उपचार केले.
यानंतर संस्थेचे अध्यक्ष सुशील विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाशी संपर्क साधण्यात आला. वनक्षेत्रपाल वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी गुट्टे व वनरक्षक ससाणे यांनी घोरपडीला ताब्यात घेत सुरक्षित वनक्षेत्रात मुक्त केले.
या बचावकार्यात सहभागी सर्पमित्रांचे वनविभागाने कौतुक केले. वनक्षेत्रपाल वसंत चव्हाण यांनी वन्यजीव संरक्षणासाठी स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. तर सुशील विभुते यांनी नागरिकांनी वन्यप्राण्यांना इजा न करता तत्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. वन्यजीव संवर्धनासाठी नागरिक, सर्पमित्र आणि वनविभाग यांचा समन्वय अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.




