काळेवाडीत वीज वितरणाच्या डीपीवर चोरट्यांचा डल्ला ! 80 किलो कॉपर कॉईल लंपास
कापूरहोळ : भोर तालुक्यातील काळेवाडी येथे वीज वितरणाच्या डीपीवरील ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून त्यातील कॉपर कॉईल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे काळेवाडी येथील दत्तात्रय जाधव यांच्या शेतामध्ये बसविण्यात आलेल्या 100 केव्ही क्षमतेच्या डीपीला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील ऑईल सांडवले तसेच ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे 80 किलो वजनाची कॉपर कॉईल चोरी करून नेली. चोरीस गेलेल्या मालाची अंदाजे किंमत 30 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी तेजस दत्तात्रय बादाडे (रा. पिसावरे, ता. भोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 344/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 324(4) व वीज कायदा कलम 136 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.




