ताज्या घडामोडी

आंतरजातीय विवाहानंतर पुण्यात थरार ! तरुणी व पतीचे कथित अपहरण !! खेड-शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांनी केली सुटका


खेडशिवापूर : सोशल मीडियावरील ओळखीचे प्रेमात आणि त्यानंतर आंतरजातीय विवाहात रूपांतर झाल्यानंतर पुण्यात घडलेल्या कथित अपहरणाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता विवाह केलेल्या २३ वर्षीय तरुणीला आणि तिच्या २८ वर्षीय पतीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्पर कारवाई करत खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ जोडप्याची सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी मूळची उत्तर प्रदेशातील असून ती चेन्नई येथे राहत होती. तरुणही उत्तर प्रदेशातील असून सुतारकामाचा व्यवसाय करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली आणि त्याचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. कुटुंबीयांचा विवाहाला विरोध असल्याने तरुणी सुमारे दहा दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. त्यानंतर दोघांनी कायदेशीर पद्धतीने विवाह केला.

Advertisement

दरम्यान, मुलीचा शोध घेत तिचे वडील, एक नातेवाईक आणि तामिळनाडू पोलीस दलातील एक कॉन्स्टेबल पुण्यात आले. सोमवारी रात्री आंबेगाव पठार परिसरात त्यांनी जोडप्याला बोलावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांचे हात-पाय बांधून जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेण्यात आले, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
अपहरणकर्ते जोडप्याला म्हाळुंगे येथील एका लॉजमध्ये घेऊन गेल्याचे समोर आले. तेथून ते साताऱ्याच्या दिशेने निघाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ कार अडवली आणि जोडप्याची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणी तरुणीचे वडील, त्यांचा नातेवाईक तसेच चेन्नई पोलीस दलातील कॉन्स्टेबल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!