मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न ! हिंदू एकतेचे भव्य दर्शन
कापूरहोळ : मोहरी खुर्द (ता. भोर) गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने मोहरी खुर्द येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात हिंदू समाजाने प्रचंड उपस्थिती लावून एकतेचे अनन्यसाधारण दर्शन घडवले. या भव्य संमेलनाने गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाला नवे ऊर्जावान प्रेरणास्रोत मिळवून दिला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवराय महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
हिंदू जनजागृती समितीच्या डॉ. ज्योती काळे यांनी मातृशक्तीच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, मातृशक्ती हाच समाजाचा आधारस्तंभ आहे. आपल्या संस्कृतीत मातेचे स्थान सर्वोच्च आहे. प्रत्येक महिलेला स्वतःची आणि समाजाची रक्षा करण्यासाठी सजग राहावे लागेल.
ह.भ.प. नवनाथ महाराज गाडे यांनी भारताच्या गौरवशाली इतिहासाची मांडणी करत सांगितले, आमचा इतिहास शौर्य, धर्म आणि संस्कृतीने नटलेला आहे. या वारशाला जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आजच्या काळात धोका वाढले आहेत. स्वसंरक्षणाचे ध्येय ठेवा आणि एकजुटीने उभे राहा.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त ‘पंच परिवर्तन’ याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, संघाच्या शताब्दी वर्षात पंच परिवर्तन चरित्र, विचार, कौशल्य, सेवा आणि संघटना ही प्रत्येक हिंदूच्या जीवनात घडवावीत.
स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने संमेलन यशस्वी केले. प्रचंड गर्दी, उत्साह आणि शिस्त यामुळे हे संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी ऐतिहासिक ठरले. या एकतेच्या बलावर भविष्यातील आव्हानांना तोंड देण्याची प्रेरणा मिळाली.




