भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांची यशस्वी मध्यस्थी ! दोन जिल्ह्यातील, दोन तालुक्यातील, दोन गावातील !! १४ वर्षाचा शिव रस्त्याचा वाद संपुष्टात
भोर : १४ वर्षापासून वडगाव डाळ (ता. भोर, जि.पुणे) आणि खंडाळा तालुक्यातील राजेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील असलेला पुणे व सातारा जिल्हा सीमेवरील वादग्रस्त शिव रस्ता भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या पुढाकाराने सामोपचाराने व न्यायालयीन वाद मिटवून अखेर खुला करण्यात यश आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भोर तहसीलदारांकडे १४३ अंतर्गत सुनावणी सुरू होती. त्याचवेळी वादी-प्रतिवादी यांच्यात सामोपचाराने तोडगा निघून पर्यायी रस्त्यास मान्यता देण्यात आली होती.अलका मदन दिवाण यांनी स्वतःच्या गट क्रमांक ४४ मधील जागेतून पश्चिम बाजूने १५ फूट रुंदीचा रस्ता देण्यास संमती दिल्याने हा वाद संपुष्टात आला. भोर व खंडाळा तालुक्याचे दोन्ही तहसीलदार यांच्या उपस्थितीत मंगळवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मदन दिवाण यांच्या संमतीने हा शिव रस्ता खुला करुन देण्यात आला आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली, भोर तहसीलदार राजेंद्र नजन, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, नायब तहसीलदार वृषाली घोरपडे, ॲड. विजय मुकादम, ॲड. ञिंबकराव देशमुख, मंडलाधिकारी चंद्रशेखर जगताप, माजी सभापती राजू तांबे, राजगड कारखान्याचे संचालक सुधीर खोपडे, सरपंच नवनाथ चौधरी, दत्तात्रय मोरे, प्रदिप निकम, सागर बरके, संदिप गायकवाड, सचिन खोपडे, अरुण डाळ, चंद्रकात डाळ, सचिन मांडके, हरीचंद्र शेडगे, सुरेश डाळ, स्वाती गायकवाड, मनिषा डाळ, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
वडगाव डाळ (ता.भोर, जि.पुणे) राजेवाडी (ता.खंडाळा, जि. सातारा) या दोन्ही गावच्या ग्रामस्थनी भोर तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र नजन यांचे आभार मानले तसेच १४ वर्षाचा वाद यशस्वी मध्यस्थी करुन मिटवल्यामुळे त्यांचे प्रशासकीय, राजकीय अशा विविध स्तरामधून कौतुक होत आहे.




