ताज्या घडामोडी

राजगड पोलिसांची महिला सुरक्षा व सायबर जागृती मोहीम ! बचत गटांमधून जनजागृती !! महिलांसाठी विशेष सुरक्षा संवाद


खेडशिवापूर : महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसह वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलीस स्टेशनच्या वतीने मौजे खेड (ता. हवेली, जि. पुणे) येथे बचत गटाच्या माध्यमातून विशेष जनजागृती व संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
दि. २३ मे रोजी पार पडलेल्या या उपक्रमात महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम यांनी उपस्थित महिलांना सुरक्षा, सायबर फसवणूक प्रतिबंध आणि मुलींच्या संरक्षणा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या वेळी आणीबाणीच्या प्रसंगी घाबरून न जाता तात्काळ ‘११२’ या आपत्कालीन हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. या सेवेमुळे जीपीएस प्रणालीच्या मदतीने पोलीस घटनास्थळी त्वरित पोहोचू शकतात, अशी माहिती देण्यात आली. तसेच मोबाईल सुरक्षिततेसाठी पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट लॉकचा वापर, अनोळखी व्हिडिओ कॉल्स टाळणे आणि सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती अथवा कौटुंबिक फोटो शेअर करताना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला.

Advertisement

सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये बँक अधिकारी असल्याचे भासवून ओटीपी, एटीएम किंवा खात्याची माहिती मागितल्यास ती कोणालाही देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले. ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास पहिल्या दोन तासांत ‘१९३०’ सायबर हेल्पलाईन किंवा अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदविल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक असल्याची माहितीही देण्यात आली.

याशिवाय पालकांनी मुलींशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवून त्यांच्या दैनंदिन हालचाली जाणून घ्याव्यात, लहान मुलींना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ यातील फरक समजावून सांगावा, तसेच इंटरनेट वापरावर पालकांनी लक्ष ठेवण्यासाठी ‘सेफ सर्च’ व ‘पेरेंटल लॉक’चा वापर करावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामीण भागातील महिला व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!