मयत खातेदारांच्या नोंदीमुळे शेतकरी अडचणीत ! फार्मर आयडी निर्मितीत अडथळे !! भोर तालुका वंचित बहुजन आघाडी आक्रमक
भोर : दि. 18 मे (सोमवार) वंचित बहुजन आघाडी भोर तालुक्याच्या वतीने नवीन फार्मर आयडी तयार करताना मयत खातेदाराचे नाव सातबारा व संबंधित नोंदीमध्ये दिसत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार होत नसल्याची गंभीर समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यासंदर्भात माननीय उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, फार्मर आयडी तयार न झाल्यामुळे अनेक शेतकरी विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहत असून त्यांना आर्थिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. मयत खातेदारांच्या नावामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
यावर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागास योग्य सूचना देऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना दिले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रमोद भालेराव, दिपक गायकवाड, सतीश अडसूळ, विश्वास कदम, चंद्रकांत भालेराव, विलास कदम यांच्यासह युवक व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.




