दारू, मटका आणि जुगार अड्ड्यांवर कारवाईची मागणी ! भोर पोलिसांना राष्ट्रवादीचे साकडे
भोर : भोर शहरात वाढत चाललेल्या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अवैध दारू विक्री, मटका, जुगार अड्डे तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोर पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज भोर पोलीस स्टेशन येथे भेट देत पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांना निवेदन सादर केले. निवेदनामध्ये शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध धंद्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच अशा बेकायदेशीर व्यवसायांमुळे युवकांवर होणारे दुष्परिणाम, वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सामाजिक वातावरणावर होणारा विपरीत परिणाम याबाबतही पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी भोर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रामचंद (नाना) आवारे, नगरसेवक केदार देशपांडे, कुणाल धुमाळ, सोमनाथ ढवळे, संदीप (बाबू) शेटे, अतुल काकडे, सागर वालगुडे, सोनल साळुंखे, सोमेश घोणे, बाळा शेटे, मनीष धुमाळ, मयूर भिसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत शहरातील अवैध धंद्यांविरोधात तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांनी शिष्टमंडळाला दिले. नागरिकांमध्येही या कारवाईबाबत अपेक्षा व्यक्त होत आहेत.




