ताज्या घडामोडी

नसरापूर चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीला फाशी ! न्यायालयाच्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत !! कॅंडल मार्चद्वारे चिमुरडीला भावपूर्ण श्रद्धांजली


नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावल्याने परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. अवघ्या ५५ दिवसांत या खटल्याचा निकाल लागल्याने न्यायव्यवस्थेच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

निकाल जाहीर होताच नसरापूर व परिसरातील ग्रामस्थांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी बाजारपेठेतून कॅंडल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी नागरिकांनी चिमुरडीच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली वाहत न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.

Advertisement

ग्रामस्थांनी हा निर्णय पीडित कुटुंबाला न्याय देणारा असल्याचे सांगत महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर संदेश देण्यासाठी न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या निकालामुळे नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, बालकांवरील अत्याचारांविरोधात समाजाने एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!