आरोग्य विभागाच्या नियोजनामुळे कापूरहोळमध्ये पल्स पोलिओ अभियान यशस्वी
कापूरहोळ : भोर तालुक्यातील कापूरहोळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘दोन थेंब जीवनाचे’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या मोहिमेत बालकांना पोलिओ प्रतिबंधक लशीची मात्रा देऊन त्यांचे संरक्षण करण्यात आले.
मोहिमेचा शुभारंभ कापूरहोळच्या सरपंच मंगल गाडे यांच्या हस्ते एका बालकाला पोलिओची मात्रा पाजून करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मायादीदी कांबळे, एएनएम वैशाली भगत, एमपीडब्ल्यू संतोष सोनवणे, आशा स्वयंसेविका वर्षा बोरगे, अर्धवेळ परिचारिका अमृता गाडे तसेच अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाने मोहिमेचे काटेकोर नियोजन करून गावातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेतली. यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी घरभेटी देत पालकांशी संवाद साधला.
तसेच कापूरहोळ एसटी बसस्थानक व मुख्य चौकात विशेष लसीकरण पथके तैनात करून प्रवास करणाऱ्या कुटुंबांतील बालकांनाही तातडीने पोलिओची मात्रा देण्यात आली.
मोहिमेच्या यशासाठी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांनी गावोगावी जनजागृती करून पालकांमध्ये लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण केली. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.




