नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळेला फाशीच ! विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय !! अवघ्या ५५ दिवसांत खटल्याचा निकाल
नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. राज्यभर संतापाची लाट निर्माण करणाऱ्या या प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देत गुन्ह्याला “दुर्मिळातील दुर्मीळ” स्वरूपाचा ठरविले.
न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले की, पीडित चिमुरडी अत्यंत अल्पवयीन व असहाय्य होती. आरोपीने तिच्या निरागसतेचा गैरफायदा घेत क्रूरपणे अत्याचार करून हत्या केली. अशा प्रकारच्या अमानुष कृत्यामुळे समाजात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. आरोपीचा गुन्हेगारी पूर्वइतिहास, गुन्ह्याचे भीषण स्वरूप आणि समाजावर होणारे परिणाम लक्षात घेता फाशीची शिक्षा योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या खटल्यातील शवविच्छेदन अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे, सायबर तपास आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. आरोपीमध्ये सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयातील विविध निर्णयांचा दाखला देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही न्यायालयाकडे कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली होती. न्यायालयाने तपास यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ, सायबर पथक आणि सरकारी पक्षाच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
उल्लेखनीय म्हणजे, १ मे २०२६ रोजी घडलेल्या या अमानुष घटनेनंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करून अवघ्या १६ दिवसांत सुमारे १,२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. गुन्हा घडल्यापासून अंतिम शिक्षेपर्यंतचा संपूर्ण न्यायप्रक्रियेचा प्रवास केवळ ५५ दिवसांत पूर्ण झाल्याने हे प्रकरण देशातील सर्वात वेगाने निकाली निघालेल्या गंभीर गुन्ह्यांपैकी एक म्हणून नोंदले जाणार आहे.
५५ दिवसांत न्याय
घटना : १ मे २०२६
आरोपपत्र : १६ दिवसांत दाखल
आरोपपत्राची पाने : सुमारे १,२००
निकाल : २९ जून २०२६
शिक्षा : फाशी
न्यायालय : विशेष न्यायालय, शिवाजीनगर, पुणे




