नसरापूर चिमुकली अत्याचार-खून प्रकरणात आरोपी दोषी ! ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ गुन्हा ठरवत सरकारची सरकारची मृत्युदंडाची मागणी !! २९ जुनला शिक्षेचा निकाल
पुणे : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायालयाने दोषी ठरविले असून त्याला फाशीची शिक्षा द्यावी की जन्मठेप, याबाबतचा अंतिम निकाल २९ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यामुळे आता शिक्षेच्या निर्णयाकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मिळ” स्वरूपाचा असल्याचे नमूद केले. महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे अस्तित्वात असूनही अशा अमानुष घटना घडत असल्याने समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आरोपीला सर्वोच्च शिक्षा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या १२ महत्त्वपूर्ण निर्णयांचा दाखलाही देण्यात आला.
तपासादरम्यान सादर करण्यात आलेले डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय तपासणी, सीसीटीव्ही चित्रीकरण, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांमुळे आरोपीचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने मान्य केले. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे अत्यंत भक्कम असल्याने आरोपीच्या बचावातील कोणताही मुद्दा ग्राह्य धरता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करताना मुलगी शेडमध्ये आली होती, तिला खाऊ दिला होता आणि गोठ्याकडे नेताना ती पडून जखमी झाली, असा दावा केला होता. मात्र वैद्यकीय पुरावे, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर साक्षींच्या आधारे न्यायालयाने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.
तपासात पीडित चिमुकलीच्या शरीरावर तब्बल १८ गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. अवघ्या ३९ मिनिटांच्या कालावधीत आरोपीने हे भीषण कृत्य केल्याचे तपासातून समोर आले. याशिवाय आरोपीवर यापूर्वीही महिलांवरील अत्याचार तसेच इतर गंभीर गैरकृत्यांच्या नोंदी असल्याचा मुद्दा सरकार पक्षाने शिक्षेच्या सुनावणीवेळी उपस्थित केला.
महाराष्ट्र दिनी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथकाच्या माध्यमातून अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र दाखल केले. ५५ हून अधिक साक्षीदार, वैज्ञानिक पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यात आली.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी झाली. राज्याच्या न्यायालयीन इतिहासात अवघ्या ५५ दिवसांत अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या दुर्मिळ खटल्यांपैकी हा एक मानला जात आहे. आरोपी दोषी ठरल्यानंतर न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आता २९ जून रोजी होणाऱ्या शिक्षेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, न्यायालय आरोपीला मृत्युदंड सुनावते की जन्मठेप, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.




