ताज्या घडामोडी

हरिश्चंद्रीजवळ भीषण अपघात ! ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी !! मद्यधुंद चालकाविरुद्ध राजगड पोलिसांत गुन्हा दाखल


कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. ४) पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राजगड पोलिसांनी संबंधित जीप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश पांडुरंग पाटील (वय ३५, रा. खिरवडे, जि. सांगली) हे आपल्या कुटुंबीयांसह मारुती वॅगनार (एमएच १२ एनएफ १०३७) या वाहनातून सिद्धनाथ म्हसोबा देवदर्शनासाठी निघाले होते. पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास हरिश्चंद्री गावाजवळील सर्व्हिस रोडवर त्यांच्या वाहनाला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने (एमएच १२ आरएफ ७११३) जोरदार धडक दिली.

Advertisement

या अपघातात ज्ञानदेव गणपती दळवी (वय ६५) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच निलेश पाटील, प्रिया अमोल दळवी (वय १०), दृष्टी अमोल दळवी (वय ७) आणि शारदा ज्ञानदेव दळवी (वय ५५) हे गंभीर जखमी झाले. जखमींच्या हात-पायांना फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फिर्यादीनुसार, जीप चालक प्रसाद हनुमंत जाधव (रा. वरगळ, ता. जि. सातारा) याने मद्यप्राशन करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे हा अपघात घडला. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक ठेंबे पुढील तपास करीत आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!