नसरापूरच्या दीडघरमध्ये ८ ते ९ फुटी अजगर पकडला ! सर्परक्षकांच्या तत्परतेने संभाव्य धोका टळला !! अजगर वनविभागाकडे सुरक्षीत सुपूर्द
नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरातील दीडघर गावात विराज सूर्यवंशी यांच्या फॉर्महाऊस परिसरात आढळलेल्या सुमारे ८ ते ९ फुट लांबीच्या अजगराची यशस्वी सुटका करण्यात पुणे जिल्हा वन्य प्राणी सर्प रक्षक असोसिएशनला यश आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
फॉर्महाऊस परिसरात मोठा अजगर दिसल्याची माहिती मिळताच पुणे जिल्हा वन्य प्राणी सर्प रक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुशील विभुते यांच्यासह सदस्य विलास धोंगडे, श्रीकांत खेडकर आणि विशाल शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसर सुरक्षित करून अत्यंत काळजीपूर्वक अजगराला पकडण्यात आले.
अजगराला पकडल्यानंतर त्याची प्रकृती तपासण्यात आली. प्राथमिक उपचार करून त्याची योग्य काळजी घेण्यात आली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सुशील विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे अधिकारी पी. डी. गुट्टे यांच्या ताब्यात अजगर सुरक्षितपणे देण्यात आला.
वन्यजीव हे पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असून अशा प्राण्यांना इजा न करता वनविभाग किंवा सर्पमित्रांना त्वरित माहिती देण्याचे आवाहन सर्परक्षकांनी केले. सर्परक्षकांच्या तत्परतेमुळे अजगरासह नागरिकांचाही जीवित धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.




