ताज्या घडामोडी

एका दिवसाच्या स्त्री अर्भकाला अज्ञाताने बेवारस सोडले ! कानंदमधील डोंगरात मृतदेह आढळला !! राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना 


वेल्हा : राजगड तालुक्यातील मौजे कानंद येथील डिंगळीच्या डोंगर परिसरात अंदाजे एक दिवसांच्या स्त्री जातीच्या नवजात अर्भकाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. १६ जून) ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिंगळीच्या डोंगर परिसरातील एका झाडाजवळ नवजात अर्भक पडून असल्याची माहिती मिळताच वेल्हा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अर्भकाला तातडीने ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय, वेल्हा येथे हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर अर्भक मृत असल्याचे घोषित केले.

Advertisement

त्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी मृतदेह पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. अर्भक त्या ठिकाणी कोणाकडून आणि कोणत्या परिस्थितीत सोडण्यात आले, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक नागरिकांची चौकशी तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

दरम्यान, अर्भक किंवा संबंधित पालकांविषयी कोणतीही माहिती असल्यास वेल्हा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!