पोलीस हवालदार नाना मदने यांचा राज्यस्तरीय सन्मान ! गुन्हे तपासात उल्लेखनीय योगदान
कापूरहोळ : राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार नाना मारुती मदने यांना उत्कृष्ट तपासकार्य आणि गुन्ह्याच्या उकलमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. या सन्मानामुळे राजगड पोलीस ठाण्यासह पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
राजगड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान नाना मदने यांनी दाखविलेली तत्परता, दक्षता आणि व्यावसायिक कौशल्य विशेष ठरले. तपासातील महत्त्वाचे धागेदोरे शोधणे, पुरावे संकलित करणे, आरोपींपर्यंत पोहोचणे तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक बाबी प्रभावीपणे हाताळण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ या सन्मानाने गौरविले.
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आलेले हे प्रशस्तीपत्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. नाना मदने यांच्या या यशाबद्दल वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी तसेच भोर-राजगड परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत भविष्यातही अशीच उल्लेखनीय सेवा देण्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.




