इंगवलीत साकार होणार दादा कोंडके स्मृतीस्थळ ! संग्रहालय, संशोधन केंद्रासह आधुनिक सुविधा
कापूरहोळ : भोर तालुक्यातील इंगवली येथे महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, अस्सल मराठमोळी शैली, खुमासदार विनोद आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाच्या जोरावर ज्येष्ठ अभिनेते स्व. दादा कोंडके यांच्या स्मृतींना अभिवादन करणाऱ्या भव्य स्मारकाच्या उभारणीचा शुभारंभ इंगवली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजन सोहळ्यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना, दादा कोंडके यांचे स्मारक हे केवळ एक वास्तू नसून भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याचे सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास, दादा कोंडके यांचे कलात्मक योगदान आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी हे स्मारक महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या स्मारकात संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन दालन तसेच आधुनिक सभागृह उभारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक, चित्रपट अभ्यासक आणि कला रसिकांना दादा कोंडके यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मनोगतात दादा कोंडके यांच्या समृद्ध कलावारशाचे जतन करण्यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
सोहळ्यास मा. शंकरभाऊ मांडेकर, भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब गरूड, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, दिग्दर्शक व अभिनेते विजय कोंडके, तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, सरपंच सारिका बांदल, उपसरपंच अमर गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले, प्रास्ताविक विजय नाना कारभळ यांनी तर आभार दिग्विजय बांदल यांनी मानले.
इंगवली येथे उभारले जाणारे हे स्मारक मराठी चित्रपटसृष्टीच्या सांस्कृतिक नकाशावर महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




