राजगड तालुक्यातील मालवलीत किरकोळ वादातून युवकाचा खून ! अल्पवयीन आरोपी ताब्यात
वेल्हा : राजगड तालुक्यातील मालवली गावात किरकोळ वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (१४ जून) दुपारी घडली. या घटनेत विकास सुरेश जाधव (वय १८, रा. मालवली) या युवकाचा मृत्यू झाला असून वेल्हे पोलिसांनी १५ वर्षे १० महिने वयाच्या विधिसंघर्षित (अल्पवयीन) मुलाला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी रोहन पांडुरंग पवार (वय २३) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवली येथील राजतोरण शाळेच्या मैदानाजवळील आंब्याच्या झाडाखाली काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी करत वाद मिटविला होता.
मात्र, काही वेळानंतर संबंधित अल्पवयीन मुलाने पुन्हा मैदानाजवळ जाण्याचा आग्रह धरला. तेथे विकास जाधव व आरोपी यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपीने विकासचा गळा दाबल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. उपस्थितांनी दोघांना वेगळे केले; मात्र विकासची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.




