ताज्या घडामोडी

मोहरी खुर्द येथे ढोल-ताशांचा गजर ! पुष्पवृष्टी, औक्षण आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटप !! नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात


कापूरहोळ : “ज्ञानमंदिराची घंटा” वाजताच मोहरी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासन, ग्रामस्थ आणि पालकांनी केलेल्या विशेष नियोजनामुळे पहिल्याच दिवशी शाळा परिसर आनंदोत्सवाने फुलून गेला.

नवीन विद्यार्थ्यांना पारंपरिक बैलगाडीतून ढोल-ताशांच्या गजरात शाळेत आणण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढून स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देत तसेच पुष्पवृष्टी करत त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास विशेष खुलून दिसत होता.

Advertisement

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेने राबविलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांनी आणि ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले.

कार्यक्रमास गावचे माजी सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर पांगारकर, उपाध्यक्षा वैशाली पांगारकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विश्वास पांगारकर, माजी उपाध्यक्षा मोनाली पांगारकर, माजी अध्यक्ष अंकुश पांगारकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन पांगारकर, माजी उपसरपंच मनीषा पांगारकर यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोड खाऊ वाटपाने कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण समारोप झाला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!