ताज्या घडामोडी

मार्गासनीला प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका ! शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालय पाण्याखाली !! संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत : मा.सरपंच विशाल वालगुडे


मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील मार्गासनी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी तसेच ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नसरापूर–वेल्हे मुख्य मार्गावरील नालेसफाई व गटार व्यवस्थेची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतच्या गटारांतील पाणी थेट रस्ता ओलांडून शाळेच्या आवारात शिरले. त्यामुळे शाळा परिसर जलमय झाला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयालाही या पाण्याचा फटका बसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement

या संदर्भात माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे राजगड तालुका उपाध्यक्ष विशाल मारुती वालगुडे यांनी प्रशासनावर कठोर टीका केली आहे. “मुख्य महामार्गावरील नालेसफाई व गटार दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी असताना संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत. परिणामी शाळकरी मुलांच्या जीविताला व आरोग्याला धोका निर्माण झाला आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मार्गासनी ग्रामस्थांनी तातडीने नालेसफाई, गटार दुरुस्ती व पाणी निचरा व्यवस्था सुधारण्याची मागणी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध नोंदविला आहे. संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!