हरिश्चंद्रीत तुटलेल्या वीजतारेचा पुन्हा बळी ! दोन दिवसांत दुसऱ्या गाभण गायीचा मृत्यू !! महावितरणाचा निष्काळजीपणा उघड !!! शेतकऱ्यांमध्ये संताप
कापूरहोळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मुख्य वीजवाहिनी तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. ३१ जुलै) घडली. या घटनेत शेतकरी तसेच परिसरातील इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र याच परिसरात अवघ्या दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारची दुर्घटना घडल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय शेतात चरण्यासाठी गेली असताना तुटलेल्या वीजतारेच्या संपर्कात आली. तीव्र विद्युत प्रवाहामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीचाही वीजतार अंगावर पडल्याने मृत्यू झाला होता. सलग दोन घटनांमुळे परिसरातील वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, परिसरात वीजतारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून देखभाल व दुरुस्तीच्या अभावामुळे जनावरांसह मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने सर्व वीजवाहिन्यांची तपासणी करून धोकादायक तारा व पोलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
घटनास्थळी स्थानिक कोतवाल, शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता तसेच किकवी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी केली. मृत जनावरांच्या मालकांना तातडीने नुकसानभरपाई देऊन भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




