ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील दोन्ही धरणांची शंभरीकडे झेप ! भाटघर ९५ टक्के, नीरा देवघर ९८ टक्के भरले !! नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू !!! प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा


भोर : भोर तालुक्यातील घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेकडे वेगाने वाटचाल करत आहेत. सध्या भाटघर धरण ९५ टक्के तर नीरा देवघर धरण ९८ टक्के भरले असून लवकरच दोन्ही धरणे शंभर टक्के क्षमतेने भरतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. वाढत्या जलसाठ्यामुळे भाटघर धरणातून वेळवंडी नदीपात्रात १,६३१ क्युसेक तर नीरा देवघर धरणातून १६,३७४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

मागील वर्षीही याच कालावधीत दोन्ही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होता. यंदाही धरणे भरत आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहनचालकांनी काळजीपूर्वक प्रवास करावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

घाटमाथा, डोंगर, टेकड्या, धबधबे, धरण परिसर व नदीकाठच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणे टाळावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी नागरिकांना केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!