विद्यार्थिनींच्या आरोग्य व शैक्षणिक प्रगतीला मिळणार बळ ! अनंत डिफेन्स सिस्टीम्स, गुडविल इंडिया आणि एसएनडीटी महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम
पुणे : शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थिनींना मूलभूत गरजांचीही चिंता भेडसावत असते. अशा गरजू विद्यार्थिनींना आधार देण्यासाठी पुण्यातील एसएनडीटी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा. लि. आणि गुडविल इंडिया या तीन संस्थांनी एकत्र येत स्तुत्य सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील ५० गरजू विद्यार्थिनींना पुढील एक वर्ष दररोज मोफत पौष्टिक दुपारचे भोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या उपक्रमासंदर्भातील एक वर्षाच्या सामंजस्य करारावर शनिवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अनंत डिफेन्स सिस्टीम्सचे प्रमुख चेतन धारिया, गुडविल इंडियाचे प्रमुख कालिदास मोरे आणि एसएनडीटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी करारावर स्वाक्षऱ्या करून उपक्रमाचा शुभारंभ केला.
करारानुसार विद्यार्थिनींच्या भोजनाचा संपूर्ण आर्थिक भार अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा. लि. उचलणार असून, गुडविल इंडिया ही सामाजिक संस्था दररोज पौष्टिक भोजन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सांभाळणार आहे. या माध्यमातून विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना शिक्षणासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी बोलताना चेतन धारिया यांनी हा उपक्रम केवळ अन्नदान नसून सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कालिदास मोरे यांनी तीन संस्थांच्या सहकार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यास लाभ होऊन त्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल, असे नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या वतीने चेतन धारिया व कालिदास मोरे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन चेतना खळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्या डॉ. अंजली कदम यांनी केले.




