भोंगवलीतील तणावाला मध्यस्थीची जोड ! पोलिस व ग्रामस्थांमध्ये अखेर समन्वय !! ‘निरपराधांना त्रास नको’ महिला व ग्रामस्थांची भूमिका
कापूरहोळ : भोंगवली येथील प्रस्तावित सोलर सबस्टेशन प्रकल्पस्थळी मशिनरी, वाहने आणि कार्यालयाची जाळपोळ झाल्याप्रकरणी पोलिसांनी चौकशीची मोहीम सुरू केली असता शुक्रवारी गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर राजगड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून जखमी कामगारांकडून माहिती घेतली व तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी ग्रामस्थांची चौकशी सुरू केली.
चौकशीसाठी पोलिस गावात दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी, “आमचा जाळपोळ प्रकरणाशी कोणताही संबंध नाही,” अशी भूमिका घेत चौकशीस विरोध दर्शविला. दरम्यान, पोलिसांनी चार महिला व दहा ग्रामस्थांना पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेल्याने गावात नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
सायंकाळी आणखी काही तरुणांना चौकशीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी रस्त्यावर उतरून पोलिसांना अटकाव केला. त्यामुळे काही काळ पोलिस व ग्रामस्थ आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले होते.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार संग्राम थोपटे, चंद्रकांत बाठे, कुलदीप कोंडे आणि रोहन बाठे यांनी घटनास्थळी भेट देत दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधला. जाळपोळ प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, मात्र निरपराध नागरिकांना त्रास होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर पोलिसांनी महिलांना सोडण्याचे आश्वासन दिल्याने गावातील तणाव निवळला.




