मुळशी तालुक्यातील भरे येथील इंग्लिश मीडियम शाळेत ११.७० लाखांची धाडसी घरफोडी ! ‘चड्डी-बनियान’धारी तिघे सीसीटीव्हीत कैद
मुळशी : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भरे येथील श्री विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरीची संपूर्ण घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये तीन संशयित चोरटे केवळ चड्डी आणि बनियान परिधान करून वावरताना दिसत असल्याने परिसरात ‘चड्डी-बनियान गँग’ पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ही घटना ३ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. चोरट्यांनी प्रथम शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयाच्या सुरक्षाद्वाराचे कुलूप फोडून ते कार्यालयात शिरले. तेथील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून कपाटामधील १ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
याशिवाय कपाटात ठेवलेली अन्नपूर्णा देवीची चांदीची मूर्ती, चांदीचा हार, चांदीचा मोदक यांसारख्या धार्मिक व मौल्यवान वस्तूही चोरट्यांनी लंपास केल्या. चोरीचा डाव यशस्वी झाल्यानंतर त्यांनी प्राचार्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करून टेबलच्या ड्रॉवरची उचकापाचक केली. त्यामधून सुमारे सहा तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या बांगड्यांचा संच चोरून नेल्याचे समोर आले आहे.
चोरीची घटना लक्षात येताच शाळा प्रशासनाने तत्काळ पौड पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी सुचित्रा साठे यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. शैक्षणिक संस्थेतील या मोठ्या चोरीमुळे परिसरातील शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.




