ससेवाडीच्या सुवर्णा कापरे यांची ‘ग्लोबल टीचर’ म्हणून सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड
खेडशिवापूर : भोर तालुक्यातील ससेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील व आदर्श शिक्षिका सुवर्णा मारुती कापरे यांची पुणे जिल्हा परिषद राबवत असलेल्या ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रमांतर्गत ‘ग्लोबल टीचर’ म्हणून निवड झाली असून शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमता व कौशल्य विकासासाठी आयोजित सिंगापूर येथील विशेष अभ्यासदौऱ्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या यशामुळे भोर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीच्या माध्यमातून झालेल्या निवड प्रक्रियेत कापरे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत ही संधी मिळवली. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी त्या शाळेत कोडिंग, परकीय भाषा शिक्षण, इको क्लब, खेळातून शिक्षण, विविध अध्यापन पद्धती आणि मनोरंजक शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवत आहेत.
जिल्हा परिषद पुणे, अमेझॉन फ्युचर आणि एलएफई टीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोडिंग प्रशिक्षण उपक्रमात त्यांनी सलग तीन वर्षे ‘टॉप टीचर’ म्हणून यश संपादन केले आहे. तसेच शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेअंतर्गत फ्रेंच परकीय भाषा स्पर्धेत पुणे विभाग स्तरापर्यंत मजल मारली आहे.
या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सुजाता देशमाने, विस्तार अधिकारी लोखंडे, केंद्रप्रमुख कारभळ, शिक्षक नेते पोपट निगडे, ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




