ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांनी सांभाळली शिक्षकांची धुरा ! शिक्षक झाले मार्गदर्शक !! किकवी विद्यालयात शिक्षक दिनाचा आगळावेगळा उत्सव


कापूरहोळ : किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी (ता. भोर, जि. पुणे) येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयात राबविण्यात आलेल्या ‘विद्यार्थी शिक्षक दिन’ या अभिनव उपक्रमाने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारत विविध वर्गांमध्ये अध्यापन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अध्यापन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि जबाबदारीची भावना विकसित होण्यास मोठी मदत झाली.

कार्यक्रमादरम्यान इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे जीवनातील महत्त्व, त्यांचे योगदान आणि शिक्षक-विद्यार्थी नाते याविषयी प्रभावी मनोगते व्यक्त केली. मुख्याध्यापक श्री. विनोद राऊत यांनी विद्यालयात राबविण्यात येणारे पर्यावरण संवर्धन, शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षा मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा, एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा, शैक्षणिक सहली, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती दिली.

Advertisement

कार्यक्रमास किकवी शिक्षण संस्थेचे चेअरमन दत्तात्रय विठ्ठल भिलारे प्रमुख उपस्थित होते. मुख्याध्यापक विनोद राऊत यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी चेअरमन श्री. दत्तात्रय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात झालेल्या भौतिक सुधारणा आणि शैक्षणिक सुविधांच्या विकासाचा विशेष उल्लेख करण्यात आला. श्री. भिलारे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत विद्यालयाच्या उज्ज्वल प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मिलिंद मगर यांनी केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!