ताज्या घडामोडी

खेड-शिवापूरमध्ये दुर्मिळ खवले मांजराचे यशस्वी रेस्क्यू ! वनपरिक्षेत्रात सुरक्षित मुक्तता !! वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनची तत्पर कारवाई


खेड-शिवापूर : पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर परिसरात दुर्मिळ आणि संरक्षित खवले मांजर (पँगोलिन) आढळून आल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली. रात्रीच्या सुमारास एका घराजवळ मांजरासारखा दिसणारा वन्यजीव दिसल्याची माहिती नागरिकांनी पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनला दिली. माहिती मिळताच संस्थेचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणीअंती तो दुर्मिळ खवले मांजर असल्याचे स्पष्ट झाले.

संस्थेचे कार्याध्यक्ष रघुनाथ वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव रक्षक विनायक मोहिते, संतोष पाटील, सोन्या कांबळे व मधुर अवसरे यांनी अत्यंत दक्षतेने खवले मांजराचे रेस्क्यू केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सुशील विभूते व उपाध्यक्ष शंकर वाडकर यांना घटनेची माहिती देण्यात आली. पुढे नसरापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधून वनविभागाला याबाबत कळविण्यात आले.

Advertisement

रेस्क्यू करण्यात आलेल्या खवले मांजराची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याच्या शरीरावर कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचे आढळून आले. वनरक्षक ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या उपस्थितीत त्याला सुरक्षित वनपरिक्षेत्रात मुक्त करण्यात आले. या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी रेस्क्यू पथकाचे कौतुक

खवले मांजर हा वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित प्राणी असून त्याची बेकायदेशीर शिकार व तस्करी रोखणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे असा वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी त्याला त्रास न देता तातडीने वनविभाग किंवा अधिकृत रेस्क्यू पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी केले.

दरम्यान, परिसरात सुरू असलेली रिंग रोडची कामे, विविध विकास प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याने अन्न व सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीजवळ येत असल्याची  चिंता वन्यजीव रक्षकांनी व्यक्त केली आहे. गेल्या २५ वर्षांपासून वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या असोसिएशनने या कार्यासाठी अधिक शासकीय मदतीची अपेक्षाही व्यक्त केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!