खेड-शिवापूर टोल नाक्यावर नसरापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ आंदोलन ! आरोपीला फाशी देण्याची मागणी !! कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
खेड-शिवापूर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी रविवारी खेड-शिवापूर टोल नाक्यावर ‘टोल बंद’ आंदोलन प्रवीण ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आले होते.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ७०० ते ८०० पोलीस अधिकारी व कर्मचारी टोल नाक्यावर तैनात करण्यात आले होते.
आंदोलक टोल नाक्यावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ताब्यात घेतले आणि राजगड पोलीस ठाण्यात हलवले. या कारवाईमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तर काही आंदोलकांनी पोलिसांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर मनमानीचा आरोप केला आहे.
या प्रकरणातील आरोपी भिमराव कांबळे (वय ६५ वर्ष) याने चिमुकलीला गोठ्यात नेऊन अत्याचार केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून तिची हत्या केली होती.या अमानुष कृत्यामुळे संतप्त नागरिकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी लावून धरली आहे.
पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आंदोलकांवर ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. नसरापूर येथील या हृदयद्रावक घटनेनंतर राज्यात ठिकठिकाणी संतापाची लाट असून, प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.




