ताज्या घडामोडी

नसरापूर ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर ! सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची आता खैर नाही !! विशेष ग्रामसभेत गावाच्या विकासासाठी व स्वच्छतेसाठी महत्त्वाचे निर्णय


नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतीत दि. १७ सप्टेंबर (बुधवार) रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत गावाच्या विकासासाठी व स्वच्छतेसाठी महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. सर्वप्रथम गावासमोरील वाढत्या कचरा समस्येवर चर्चा करून गावातील दुकानदार, घरमालक व फ्लॅट धारकांनी कचरा थेट ग्रामपंचायतीच्या गाडीत जमा करणे बंधनकारक आहे असा निर्णय घेण्यात आला. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे सरपंच उषा विक्रम कदम व उपसरपंच इरफान मुलानी यांनी सभेत स्पष्ट केले. यावेळी ग्रामपंचायतीने स्वच्छतेबाबत शून्य सहनशीलता दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५) चा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाद्वारे शासनाकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिसे देण्यात येतील, त्यामुळे नसरापूरने या स्पर्धेत जास्तीत जास्त गुण मिळवून गावाला आदर्श बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी रुपेश हारपुडे यांनी सांगितले. ग्रामपंचायतने अभियानात वेळेवर व दर्जेदार कामे करून गावाचे गुण वाढवण्यावर भर देण्याचा मानस दर्शविला आहे.

यावेळी ग्रामसभेत शेतकरी व पशुपालकांसाठी विविध शासकीय योजनाही जाहीर करण्यात आल्या. वैराण विकास योजनेअंतर्गत यंदा पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर मका व शुगर ग्रेझ बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या अनुदानामुळे हिरव्या चाऱ्याची टंचाई दूर होऊन जनावरांना पौष्टिक चारा मिळेल आणि पशुपालकांचा खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

राष्ट्रीय लाळ-खुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व दुधाळ जनावरांचे तातडीने लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याचा परिणाम उत्पादनक्षमतेवर होतो, त्यामुळे लसीकरण केल्यास रोगाचा प्रसार रोखला जाऊ शकतो आणि पशुधनाचे संरक्षण शक्य होईल. पशुधन विकास अधिकारी डॉ. ऋषिकेश पालवे यांनी शेतकऱ्यांना लसीकरणाकरता नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाशी संपर्क साधण्याचे मार्गदर्शन केले.

Advertisement

शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) बांधावर नारळ व आंबा लागवड करण्यासाठी मजुरी, रोपे, खते व औषधे मंजूर अंदाजपत्रकानुसार अनुदानातून पुरविण्यात येणार आहेत. तसेच महाडीबीटी पोर्टलद्वारे फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे व खते यासाठी अर्ज करता येतील. अर्जदारांची निवड “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर केली जाईल व कागदपत्रांची छाननी करून पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य असल्याने ग्रामसभेत शेतकऱ्यांनी आपले ओळखपत्र नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.

कृषी विभागाच्या “आत्मा” कार्यक्रमांतर्गत शेतकरी गट स्थापन करून गटशेतीच्या योजनांचा लाभ घेण्याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले. गटशेतीमुळे लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकत्र येऊन फळबाग व सिंचनाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे आणि मशीनीकरणाचे लाभही व्यापक प्रमाणावर देता येतील.

याव्यतिरिक्त, ग्रामसभेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूर येथे विविध आरोग्य शिबिरे व तपासण्या आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. या अभियानात महिलांसाठी पोषण व आरोग्य जनजागृती, माता व बाल आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिरे, असंसर्गजन्य रोग तपासणी (मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग आदि), मोफत नेत्र तपासणी व चष्मा वितरण, दंत तपासणी व उपचार शिबिरे, योग व आयुष शिबिरे, रक्तदान व अवयवदान प्रतिज्ञा शिबिरे, मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती जनजागृती, शालेय आरोग्य तपासणी व स्वच्छता जनजागृती, जिल्हास्तरावर आरोग्य मेळावे व प्रदर्शने तसेच दुर्गम भागासाठी टेलिमेडिसिन सुविधा यांचा समावेश आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड, वय वंदना कार्ड (७० वर्षांवरील वरिष्ठ नागरिकांसाठी) व इतर आरोग्यविषयक मदतीची माहिती व सेवा मिळणार आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतीने स्वच्छता, शेतकरी–पशुपालक विकास आणि आरोग्य या तिन्ही अंगांवर ठोस काम करून नसरापूरला आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या ग्रामसभेला सरपंच उषा विक्रम कदम, उपसरपंच इरफान मुलानी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कृषी सेवक एल.व्ही. पटवारी, ग्रामविकास अधिकारी रुपेश हारपुडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. ऋषिकेश पालवे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूरचे आरोग्य निरीक्षक बाळासाहेब पिसाळ आणि महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!