भोरमध्ये कारगिल युद्धाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त तिरंगा रॅली : युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण
भोर : भारतीय सैनिकांच्या कारगिल विजयीदिनानिर्मित व युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माजी सैनिक व टारगेट अँचिव अकॅडमीच्या विद्यार्थ्यानी भोर शहरात तिरंगा रॅली काढली होती, यावेळी संपुर्ण भोर शहर तिरंगामय झाले होते.
1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या दिवसाला भारतीय सैनिकांनी केलेल्या शौर्य आणि त्यागाचे स्मरण केले जाते. ऑपरेशन विजयच्या यशावरून या दिवसाचे नाव देण्यात आले आहे. आज 60 दिवसांहून अधिक काळ लढलेल्या कारगिल युद्धाचा 26 वा वर्धापन दिन आहे, जो 26 जुलै 1999 रोजी भारताच्या शौर्यपूर्ण विजयाने संपला. या युद्धात 527 भारतीय सैनिकांनी आपले प्राण दिले आहेत.
शिवतीर्थ चौपाटीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विविध संघटनांनी मानवंदना देऊन या तिरंगा रॅलीची काढून माजी सैनिक व टारगेट अँचिव अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन शहीद जवान स्मारक सम्राट चौकापर्यंत रॅली काढण्यात आली होती, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम्, भारत माता की जय, या घोषणा देण्यात आल्या युध्दात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन राष्ट्रगीत घेण्यात आले.
तसेच स्वामी विवेकानंद संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी गर्ल्स हायस्कूलमध्ये मुलींनी माजी सैनिकांबरोबर रक्षाबंधन साजरा केला, हाय्कूलचे मुख्याध्यापक काळभोर यांनी माजी सैनिकांचा सत्कार केला. रक्षाबंधनाचा हा उपक्रम स्वामी समर्थ सेवा केंद्र भोर तर्फे राबवण्यात आला होता.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष नाना समगीर, अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मोनिस पवार, स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी संतोष कदम, माजी सैनिक निवृत्ती मस्के, विजय भेलके, रणधीर जेधे, जांहगिर आत्तार, विलास बरके, राजेंद्र सातपुते, अभिमन्यू इंदलकर, ज्ञानोबा घोणे, हनुमंत बांदल, पोपट पिसे ,यशवंत डाळ उपस्थित होते.




