ताज्या घडामोडी

राजगडमध्ये (वेल्हा) पावसाचा हाहाकार ! भात पिकाचे मोठे नुकसान !! बळीराजा संकटात


 

नसरापूर : राजगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, काढणीस आलेले भात पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. एकमेव भात शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था गंभीर झाली आहे.ऐन काढणीच्या काळात पावसाने थैमान घातल्याने अनेक शेतांतील भात पिके कोसळली आहेत.

काही भागांमध्ये पाणी साचल्याने पिके कुजली असून, भिजलेल्या धान्याचा दर्जा खालावल्याने बाजारभावही कोसळला आहे. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हतबल झाला आहे.पावसाबरोबरच रानडुकरांचा धुमाकूळही वाढला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत घुसून रानडुकरांनी पिकांचा नाश केला आहे. त्यामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या अधिक तीव्र झाल्या आहेत.

याशिवाय, विंझर आणि नसरापूर परिसरात बिबट्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी वाड्या-वस्त्यांजवळ बिबट्या फिरत असल्याच्या घटना घडल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

Advertisement

राजगड तालुक्यातील बहुतांश शेतकरी भात शेतीवर अवलंबून असल्याने या पावसामुळे मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने त्वरीत पाहणी करून मदतघेण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

लक्ष्मण भोसले या प्रगतशील शेतकऱ्यांनी सांगितले की, “पावसाने आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. घरची व्यवस्था कोलमडली असून, शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी.” तर विक्रम सोनवणे या शेतकऱ्याने सांगितले, “रानडुकरांनी आणि पावसाने पिकांचे नुकसान केले. आमचे पोट हातावर आहे. शासनाने त्वरित मदत करावी.”शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश आणि नैसर्गिक संकटात त्यांची असहाय्यता पाहता प्रशासनाने तातडीने कारवाई करून मदत जाहीर करावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!