एफडीएच्या कारवाईच्या चर्चेने सारोळा हादरला ! नामांकित हॉटेलवर अचानक धाड !! व्यापाऱ्यांत एकच खळबळ
कापूरहोळ : भोर तालुक्यातील सारोळा येथील एका नामांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या पथकाने बुधवारी अचानक धाड टाकून तपासणी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कारवाईची माहिती काही क्षणांतच गावभर पसरताच छोट्या-मोठ्या हॉटेल, किराणा दुकाने, बेकरी, थंडपेय विक्रेते तसेच खाद्यपदार्थ व्यवसायिकांमध्ये धावपळ सुरू झाली. संभाव्य तपासणीच्या भीतीने अनेक दुकानदारांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ दुकाने बंद ठेवत शटर ओढले.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेलमधील अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छतेची पातळी, परवाने, उत्पादनांची मुदत, साठवण व्यवस्था तसेच अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नियमांचे पालन होत आहे का, याची सखोल तपासणी केल्याची माहिती समोर आली. आवश्यकतेनुसार काही अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी घेतल्याचीही चर्चा परिसरात होती.
या कारवाईनंतर अन्न व्यवसायिकांमध्ये अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, एफडीएकडून अधिकृत अहवाल अथवा अंतिम निष्कर्ष अद्याप जाहीर करण्यात आलेला नसून, प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या या धाडीनंतर दिवसभर सारोळा परिसरात एफडीएच्या कारवाईचीच जोरदार चर्चा रंगली होती.




