तिसरा हंडा भराल तर १०० रुपये दंड ; पाणीटंचाईमुळे पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यातील परसुल ग्रामस्थांचा अजब निर्णय
राजाराम गोरे,
खेड ता. प्रतिनिधी.
खेड : पाणी टंचाईच्या झळा आता पासुनच राज्यात जाणवू लागल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागातील खेड तालुक्यात असणाऱ्या परसूल गावात त्याची भीषणता आतापासूनच दिसून येत आहे. यागावात दर वर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई ही जाणवते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ह्या गावाजवळ असणाऱ्या विहिरीतून एका कुटुंबाला फक्त दोन हंडे पाणी नेण्याची मुभा आहे. यावर जर कोणी तिसरा हंडा नेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला १०० रुपये दंड आकारला जातो. एवढेच नाही तर कोणी चोरून पाणी नेऊ नये यासाठी रात्रीची गस्त घातली जाते.
मार्च महिना संपत आला आहे. त्यानंतर संपूर्ण एप्रिल आणि मे महिना जायचा आहे. अशातच पाणी टंचाईमुळे अनेक गावं ही चिंतेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तसं बऱ्या पैकी पाणी असताना पुण्यातील खेड तालुक्यातील परसुल नावाचे गाव आहे, तिथं भयंकर पाणी टंचाई आहे. इथं एका कुटुंबासाठी केवळ दोन हंडे पाणी दिलं जात आहे.
परसुल गावात पाण्यासाठी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून दोन महिने कडक उन्हाळ्याचे दिवस असणार आहे. गावात पूर्वीची जुनी विहिर असून या विहिरीला जेमतेम पाणी आहे. अजून दोन महिने या विहिरीतील पाणीसाठा टिकावा यासाठी ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला. माहिलांनी दिवसाला दोनच हंडे विहिरीतुन पाणी घरी आणयचे. तिसरा हंडा नेला तर १०० रुपये दंड भरायचा असा नियम ग्रामस्थांनी घातला आहे. त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी रानोमाळ पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.




