शिक्षण

पुण्यातील भोर नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षणाचा बट्ट्याबोळ


 

भोर : पुणे जिल्ह्यातील भोर नगरपालिकेच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक एक मध्ये शिक्षणाधिकारी गजानन शिंदे व प्रशासन अधिकारी राजकुमार बामणे यांनी डमी शिक्षिका शोधून काढली आहे. या दोन अधिकाऱ्यांनी अचानकपणे शाळेला भेट दिल्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून महिला शिक्षिका गैरहजर राहून स्वतः ऐवजी दुसऱ्या महिलेस वर्गात अध्यापन करायला लावून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या महिला शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.भारती दिपक मोरे असं सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या उपशिक्षिकेचं नाव आहे.या धक्कादायक प्रकारानंतर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

शिक्षणाधिकाऱ्यांनी सुरवातीला संपूर्ण शाळेची पाहणी केली. वर्गात जाऊन मुलांशी संवाद साधला. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी शिक्षकांची हजेरी वही पाहिली. त्यावेळी धकक्कादायक बाब समोर आली. एक महिला शिक्षिका काही दिवसापासून शाळेतच येत नसल्याचे निदर्शनास आले. तरी देखील ती महिला शिक्षिका नियमित दरमहा वेतन घेत आहे, ही बाब उघड झाली विशेष म्हणजे त्या गैरहजर शिक्षिकेने त्यांच्या जागेवर डमी महिला शिक्षिका नेमली होती. ही बाब शिक्षणाधिकाऱ्यांनी हेरली आणि जागेवरच महिला शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

भारती मोरे यांच्यावर विनापरवानगी गैरहजर राहणे, विनापरवानगी मुख्यालय सोडणे, कर्तव्यात निष्काळजीपणा करणे, स्वतः गैरहजर  कालावधीत खासगी व्यक्तीला वर्गाचा ताबा देणे, वर्ग उघडे ठेवून चाव्या त्रयस्त व्यक्तीकडे देणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस अडथळा निर्माण करणे, या कारणांमुळे निलंबन करण्यात आले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!