संत सोपानदेव महाराज पालखीचे सासवडमधुन १२ जुलैला प्रस्थान ! १५ जुलैला वाघळवाडीत पहिले रिंगण
सासवड : पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक सासवड नगरीतून संत सोपानदेव महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा येत्या १२ जुलैला (ज्येष्ठ वद्य द्वादशी) सकाळी ११ वाजता पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. सुमारे १२५ हून अधिक दिंड्यांसह १८० किलोमीटरचा १३ दिवसांचा हा सोहळा केवळ भक्ती परंपरेचा नसून, सासवडच्या प्रगतीशील विकासाचे प्रतीक ठरणार आहे, असे सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी सांगितले.
पालखी मार्गावरील सुधारित रस्ते, डिजिटल कनेक्टिव्हिटी, पाणी, आरोग्य सुविधा आणि ‘स्मार्ट’ नियोजनामुळे वारकरी भक्तांना अत्याधुनिक सोयी मिळणार आहेत. १५ जुलैला वाघळवाडीत पहिले रिंगण, १८ जुलैला पिंपळी येथे ‘बकरी रिंगण’ आणि २३ जुलैला वाखरी येथे भव्य उभे रिंगण होईल.
विशेष आकर्षण म्हणजे २३ जुलैला टप्पा येथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांची बंधूभेट, जी सासवडच्या सांस्कृतिक वैभवाची जागतिक ओळख घडवेल.
२४ जुलैला पालखी पंढरपूर दाखल होईल, तर २५ जुलैला आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडेल. परतीचा प्रवास ४ ऑगस्टला सासवडला येईल. वारीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तर ‘स्वच्छ सासवड, सुंदर सासवड’ मोहिमेअंतर्गत मार्ग पर्यावरणपूरक राहील.




