नवसह्याद्री महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा ! भोर तालुक्यातील पहिले महाविद्यालय ठरल्याचा मान
नसरापूर : नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या नवसह्याद्री महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्वायत्ततेचा प्रतिष्ठित दर्जा प्रदान केला आहे. भोर तालुक्यातील हे पहिले स्वायत्त महाविद्यालय ठरले असून, या निर्णयाने शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या उद्योगाभिमुख शिक्षणाला नवे आयाम मिळणार आहेत.
नायगाव येथील या महाविद्यालयातील अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर, एमबीए, एमसीए, पीएचडी संशोधन केंद्र, बीबीए व बीसीए अभ्यासक्रमांना स्वायत्त दर्जा मिळाला आहे. संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके म्हणाले, “या दर्जामुळे बदलत्या तंत्रज्ञान व उद्योग गरजेनुसार अभ्यासक्रम अद्ययावत करता येतील. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळेल.
ग्रुप डायरेक्टर सागर सुके यांनी सांगितले, “स्वायत्ततेमुळे कौशल्यविकास, संशोधन, नवोपक्रम व उद्योजकतेला चालना मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढेल.” महाविद्यालय प्रशासनाने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असून, विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव सुके, उपाध्यक्षा प्रा. सायली सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके व सर्व प्राचार्यांनी याबाबत सर्वांचे अभिनंदन केले. या महत्त्वपूर्ण पावलामुळे नवसह्याद्री महाविद्यालय राज्यातील अग्रगण्य संस्थांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास आहे.




