महिला मैत्रिणीसोबत परदेशवारीचा प्रयत्न फसला ! खोट्या कथेमुळे अपहरणाचा गुन्हा !! अखेर स्वतःहून पोलिसांसमोर कबुली
सचिन लोळे,
प्रतिनिधी.
पुणे : पुण्यातील एका ४६ वर्षीय व्यापाऱ्याने रचलेला बनाव अखेर त्याच्यावरच उलटला. महिला मैत्रिणीसोबत परदेशवारीला निघालेल्या या व्यापाऱ्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण सत्य कबूल करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यापाऱ्याने कंपनीच्या कामानिमित्त परदेशात जात असल्याचे पत्नीला सांगितले होते. प्रत्यक्षात तो आपल्या महिला मैत्रिणीसोबत क्वालालंपूरला जाण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता. मात्र, इमिग्रेशन तपासणीदरम्यान महिलेचा पासपोर्ट पूर्वी हरवलेला असल्याचे समोर आल्याने अधिकाऱ्यांनी तिला रोखले. त्यामुळे त्यांचा प्रवास रद्द झाला.
दरम्यान, पत्नीला संशय येऊ नये म्हणून व्यापाऱ्याने विमानतळा वरील लँडलाईनवरून फोन करून इमिग्रेशन विभागाने मोबाईल जप्त केल्याचा बनाव रचला. दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉलवरूनही त्याने हाच दावा कायम ठेवला. त्यानंतर त्याने मोबाईल पूर्णपणे बंद केला.
पती अडचणीत असल्याची भीती वाटल्याने पत्नीने पोलिसांकडे धाव घेत अपहरणाची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर गुन्हा नोंदविण्यात आला.
आपल्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच व्यापारी घाबरला आणि स्वतःहून सहार पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने संपूर्ण प्रकार कबूल केल्यानंतर हा गुन्हा गैरसमज व चुकीच्या माहितीमुळे दाखल झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयात ‘सी-समरी’ अहवाल सादर करून हे प्रकरण निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.




