नसरापुरात तरुणावर जीवघेणा हल्ला ! दारूसाठी पैसे न दिल्याचा संताप
नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर लांब पात्याच्या लोखंडी सुर्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्री घडली. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरंजन दीपक वाल्हेकर (वय २५, रा. नसरापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ते पोल्ट्री व्यवसायाचे काम आटोपून रात्री सुमारे १२.३० वाजता घरी जात असताना नसरापूर येथील भैरवनाथ मंदिराजवळ आरोपी भुषण अनिल वाल्हेकर याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. निरंजन यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने संतापून त्याच्याजवळील लांब पात्याच्या लोखंडी सुर्याने त्यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे.
हल्ल्यातून बचाव करण्यासाठी हात आडवा घेतल्याने त्यांच्या डाव्या हातालाही गंभीर दुखापत झाली. जखमी तरुणावर उपचार सुरू असून राजगड पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड करीत आहेत.




