रांझेतील सागर पालवे हत्येचा उलगडा ! फरार आरोपींना अखेर बेड्या !! राजगड पोलिसांचा तपास यशस्वी
खेडशिवापूर : रांझे (ता. भोर) येथे सप्टेंबर महिन्यात घडलेल्या गाजलेल्या सागर रामचंद्र पालवे खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात राजगड पोलिसांना यश आले असून, गोळीबार व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एका विधीसंघर्षित बालकाचाही या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे.
राजगड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 334/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 6 सप्टेंबर रोजी मध्यरात्री रांझे गावातील साई सप्लायर्स सिमेंट दुकानासमोर सागर पालवे यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने तोंड, डोके, हात, गुडघा व पोटावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्त तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. या कारवाईत विनायक उर्फ दादया विजय थोरात (रा. शिवापूर वाडा), सिद्धार्थ उर्फ बाबू अंकुश येमपुरे, सिद्धांत उर्फ बाबू संतोष जांभुळकर यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एका 17 वर्षीय विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक संतोष जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.




