कासुर्डीत चोरट्यांचा धुमाकूळ ! एकाच रात्रीत तीन दुकाने फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास !! व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण
कापूरहोळ : भोर-कापूरहोळ मार्गावरील कासुर्डी (गुंजन मावळ) येथे चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन दुकाने फोडून रोख रकमेसह सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
कासुर्डी स्टॉप परिसरातील नवनाथ मालुसरे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या गाळ्यांमध्ये ही चोरी घडली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांच्या वरील बाजूचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दिपक मांगडे यांचे सदगुरु मेडिकल, विशाल मांढरे यांचे श्री समर्थ कृषी सेवा केंद्र तसेच सुप्रिया जांभळे यांचे अनुष्का कलेक्शन नावाच्या दुकानाचे जास्त प्रमाणात नुकसान झाले असुन या तीन दुकानांमधील रोख रक्कम व इतर मौल्यवान साहित्य चोरून नेले. प्राथमिक माहितीनुसार या चोरीत सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे चोरीनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. दुकानांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची हार्डडिस्क चोरट्यांनी सोबत नेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तपासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, त्याच इमारतीतील गुंजवणी डिजिटल सेवा केंद्र, वनिता वडेवाले आणि आशीर्वाद चायनीज सेंटर या दुकानांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती स्थानिकाने दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
या धाडसी चोरीमुळे कासुर्डी व परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




