ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता ! ग्रामीण राजकारणात शांतता !! इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढली


मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय वातावरणाला काही काळासाठी विराम मिळण्याची चिन्हे दिसत असून, ग्रामपंचायतींच्या प्रलंबित सार्वत्रिक निवडणुका यंदा न होता थेट 2027 मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत गुंतलेल्या हजारो इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात 2024, 2025 आणि 2026 या कालावधीत मुदत संपलेल्या एकूण 15 हजार 636 ग्रामपंचायतींच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षण तसेच आरक्षण अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमुळे निवडणूक कार्यक्रमाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Advertisement

या मोहिमेद्वारे मतदारयादीतील मृत, स्थलांतरित तसेच अपात्र मतदारांची नावे वगळण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी अद्ययावत मतदारयादी आवश्यक असल्याची भूमिका अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली आहे. विशेषतः बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी अंतिम व शुद्ध मतदारयादीच्या आधारेच निवडणुका घेण्यावर प्रशासनाचा भर आहे.

पुनरीक्षणानंतरची अंतिम मतदारयादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करण्यासाठी किमान एक ते दीड महिना कालावधी लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे कठीण ठरण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम थेट 2027 मध्ये जाहीर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. परिणामी, गावागावांत सुरू असलेल्या राजकीय हालचालींना तात्पुरता ब्रेक लागण्याची चिन्हे असून, ग्रामीण राजकारणातील वातावरण काही काळासाठी शांत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!