भोर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर ! भाजपा युवा मोर्चाकडून वनविभागाला निवेदन !! तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
नसरापूर : भोर तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वाढता वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. शेतपरिसर, पाणवठे व रस्त्यांवर बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी, गुराखी, शाळेत जाणारी मुले व ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, भोर तालुका (उत्तर) यांच्यावतीने वनपरिक्षेत्र कार्यालय, नसरापूर येथे तातडीच्या उपाययोजनांची मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे.
भोर-राजगड-मुळशीचे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या निवेदनात खोपी, कुसगाव, कांजळे, वर्वे, करंदी, तांभाड, माळेगाव आदी गावांमध्ये बिबट्याच्या सतत दर्शनाचा उल्लेख करून मानवी व पशुधन सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. निवेदनात पिंजरे लावणे, वनकर्मचाऱ्यांची नियमित गस्त वाढवणे, रात्री संवेदनशील भागांमध्ये विशेष दक्षता, तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करणे अशा ठोस उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित नसल्याने निवेदन लिपिक सुनील माळवे यांच्याकडे देण्यात आले. त्याचवेळी वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा करून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली.
यावेळी भाजपा युवा मोर्चा भोर तालुका अध्यक्ष विशाल डिंबळे, सरपंच निलेश भोरडे (वर्वे), शुभम यादव, गणेश कोंढाळकर, अक्षय डिंबळे, तुषार भोरडे, आर्यन खुटवड, लक्ष्मण पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




