पुणे जिल्हा जागतिक पटलावर झळकणार ! पुण्यात प्रथमच होणार आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा २०२६
कापूरहोळ : पुढील वर्षी होणाऱ्या पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ च्या रूपाने देशात व महाराष्ट्रात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन पुण्यामध्ये केले असून स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता भोर आणि पुरंदर विधानसभा क्षेत्रामध्ये रस्त्यांच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या स्पर्धेमुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पटलावर येणार आहे असा विश्वास यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला पुणे ग्रँड चॅलेंज टूर्स स्पर्धेच्या अनुषंगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुणे शहर व पिंपरी चिंचवड, मावळ, भोर, वेल्हे, मुळशी, पुरंदर आणि बारामती या भागातून ४ टप्प्यात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण ३५ देशात होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटन संस्कृती आणि क्रीडा संस्कृतीला या स्पर्धेमुळे चालना मिळणार आहे, असेही ते म्हणाले.
या स्पर्धेत तब्बल ५० देशांचे सायकलपटू सहभागी होणार असून, ही भारतातील प्रथमच ऑलिम्पिक दर्जाची आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा ठरणार आहे. स्पर्धेचे नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने शहरात व ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे, स्पीड ब्रेकर बाबत आवश्यक कार्यवाही होणार असुन शहरातील बहुतांश भागातून स्पर्धेचा मार्ग असल्याने वाहतूक वळवणे, बॅरिकेडिंग आदींच्या अनुषंगाने सर्व पुर्वतयारी करण्यात येणार आहे.
भोर विधानसभा मतदारसंघासाठी १२१ कोटी तर पुरंदर-हवेली मतदारसंघासाठी ११४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांचे रुंदीकरण ७ मीटरपर्यंत होणार असून व दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत तसेच स्थानिकांना रोजगार निर्मितीसाठी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या स्पर्धेमुळे भोर-पुरंदर भागातील ग्रामीण पर्यटन, रोजगार निर्मिती आणि स्थानिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.
स्पर्धेच्या स्टेजेस : १) पुणे-हवेली-पीसीएमसी, अंतर : ९९.१५ किमी | उंची : ५६० मी.
२) मुळशी-मावळ-पीसीएमसी, अंतर : ९१.८ किमी. | उंची : ९५६ मी.
३) पुणे-पुरंदर-राजगड-हवेली,
अंतर : १०९.१५ किमी | उंची १४६६ मी.
४) पुरंदर-बारामती, अंतर : १३७.०७किमी | उंची : ८२० मी.
यावेळी पत्रकार परिषदेत भाजपा नेते माजी आमदार संग्राम थोपटे, पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, बाळासाहेब गरुड, जीवन कोंडे, संतोष धावले, राजू रेणुसे, सुनील पांगारे, दिपक तनपुरे, संदीप कटके, हनुमंत चव्हाण, आनंद जगताप, निलेश कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.




